थोडे माझ्याबद्दल
हे संकेतस्थळ महाराष्ट्रातील जनतेसमोर सादर करताना मला मनस्वी आनंद होत आहे.या संकेतस्थळासाठी ज्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली आणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी ऋणी आहे. भूतकाळातील गतस्मृतींची आठवण साठवणीच्या रुपाता या संकेतस्थळावर राहिल हि माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. माझ्या २५ वर्षांच्या राजकिय कारकिर्दित अनेकदा उलथापालथ झाली अनेक आनंदाचे, खाचखळग्यांचे, ताणतणावाचे क्षण मी अनुभवले आहेत. त्या भूतकाळातील आठवणी तसेच भविष्यातील माझ्या मनातील संकल्पनांचा आढावा तुमच्यासमोर असणार , एक माझे स्वताचे व्यासपिठ म्हणजेच हे संकेतस्थळ असेल.

माझगांव विधानसभेतील मी लढवलेल्या ३ निवडणूका त्यावेळी उडालेला राजकिय धुरळा, बाळा नांदगांवकर या नावामागे लागलेली जायंटकिलर हि उपाधी (इथे कुणालाही दुखावण्याचा हेतु नाही) माझगांव मधील प्रत्येक व्यक्तीशी असणारा माझा जिव्हाळा, माझगांव मधील सामाजिक कार्ये, थोरामोठ़यांशी असणारा ऋणानुबंध, मनाचा कोंडमारा, राजकिय परिवर्तन, त्यातुनच नव्याने पुन्हा राजकिय पटलावर उभा राहिलेला बाळा नांदगांवकर. सामाजिक सेवा त्यातुनच मिळालेला मानसन्मान, त्यानंतर घडणारा नवनिर्माणाचा नवा प्रवास या संकेतस्थळाच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत साकारणार आहे.

माझगांवातल्या ताडवाडीतले माझे बालपण. त्या ताडवाडीत मी लहानाचा मोठा झालो, खेळलो बागडलो, अगदी भांडलोदेखील. रक्ताच्या नात्यासारखी जिवाभावाची भावनिक नाते जपणारी , प्रेम देणारी माणसे इथे भेटली. सामाजिक कार्याचा श्री गणेशा ताडवाडीच्या भूमीतूनच झाला. तिथल्या स्थानिकांच्या नागरी समस्यांची मला लहानपणापसूनच जाण होती. सामाजिक सेवेचे बाळकडू माझ्यामध्ये उपजतच होते आणि सामाजिक सेवेचे संस्कार मोठ्या साहेबांकडून (आदरणीय श्री. बाळासाहेब ठाकरे) मिळाले होते. प्रथमतः मी नगरसेवक झालो ते साहेबांच्या आशिर्वादाने, त्यानंतर माझ्या सामाजिक कार्याची जाण ठेवून मला आमदारकीचा बहुमान मिळाला. १९९५ ची निवडणूक म्हणजे माझ्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा. माझगांवातल्या प्रस्थापित राजकिय नेत्याविरुध्द (तत्कालीन बांधकाम मंञी श्री. छगन भुजबळ साहेब) मला साहेबांनी निवडणूक रिंगणात उतरवले. माझगांवकरांच्या आशिर्वादाने, तळागळातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे, पदाधिकारयां मुळे मी निवडणूक जिंकलो नव्हे तर माझगांवकरच निवडणूक जिंकले. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या ह्या निवडणुकीमुळे माझ्या अवती भवती प्रसिध्दीचे वलय निर्माण झाले. माझगांव गड शाबूत ठेवणे सर्वस्वी जवाबदारी मी निस्वार्थीपणे, निरपेक्षवृत्तीने मनापासून जपली म्हणूनच सतत ३ वेळा माझगांवकरांनी मला आमदारकीचे प्रतिनिधित्व दिले. युती शासनाच्या काळात गृहराज्यमंञी पदाची जबाबदारी मिळाली. या प्रवासातच माझ्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने मला उत्कृष्ट संसदपटू चा पुरस्कार बहाल केला.

माझे राजकिय परिवर्तन परिवर्तन हा संसाराचा नियम आहे असाच परिवर्तनात्मक नियम नियतीने माझ्या हि आयुष्यात घडवला. माझगांव विधानसभेतील माझी तिसरी निवडणूक मी पराभूत व्हावी अशी इच्छा दुर्दैवाने पक्षातीलच काही मंडळींची होती. त्यासाठी अनेक नितिंचा त्यांनी वापर केला. पैशाने गब्बर असलेल्या महाभागाला माझ्या विरोधात उभे करुन पाठीत वार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला, पण माझ्यामागे समस्त जनता, जागृत देव-देवतांचा आशिर्वाद होता, तळागळातील प्रत्येक कार्यकर्त्यांची, पदाधिका-यांची निस्वार्थी मेहनत होती. त्या निवडणूकीत प्रस्थापित राजकिय नेत्याच्या (श्री. छगन भुजबळ यांचे पुञ) युवराजांचा (पंकज भुजबळ) पराभव करण्यात आम्ही सर्व यशस्वी ठरलो. २००४ चा तो काळ म्हणजे महाराष्ट्राची सत्ता खेचुन आणण्याची सुवर्णसंधीच होती. सरकार दरबारी सत्ता उपभोगणारा पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला होता. परंतू आप्तस्वकियांची खेकडावृत्तीच (पाय खेचण्याची) शिवसेना पक्षाला हानीकारक ठरली. जो प्रकार माझगांव विधानसभेत करण्याचा प्रयत्न झाला तोच प्रकार महाराष्ट्रातील बहुतांश मतदार संघात घडला. परिणामी मिळणारी सत्ता हातची निसटुन गेली. माझ्या तक्रारीचा सुर मी पक्षश्रेष्ठींकडे कळवला परंतू त्यातून काहिही निष्पन झाले नाही.

मराठीच्या न्यायहक्कासाठी धडाडणा-या तोफा काहिशा थंड पडल्या होत्या. समज-गैरसमजाच्या राजकारणाने एक वेगळाच नूर पालटला होता. दस्तरखुद्द पक्षातीलच एक जेष्ठ तरुण उमदे व्यक्तीमत्व श्री. राज ठाकरे मनाचा कोंडमारा करून दिवस ढकलत होते आणि अचानक एक दिवस उद्रेक झाला. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा कौल घेवून ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष राजकिय पटलावर विराजित झाला. मनाच्या कोंडमा-यातून एक नवं परिवर्तन माझ्याही आयुष्यात घडून आले. त्यावेळी मा. राजसाहेबांबरोबर तत्कालीन आमदार म्हणून फिरणारा मी एकटाच होतो. नवनिर्माणाच्या विचारांची कास धरून, समस्त महाराष्ट्रातील तमाम मराठी तरूणांना, अबाल वृध्दांना, महिलांना एकञ घेवून एक नवा इतिहास घडवण्याचे व्रत आम्ही मनापासून घेतले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौरंगी ध्वजाखाली एक नवी इनिंग खेळण्यासाठी आम्ही सज्ज झालो.