राजला खाजगीत अगदी जवळचे मित्र आणि नातेवाईक राजा म्हणतात. हे त्याला एकदम फिट्ट बसणारं नाव आहे. जर त्याचं स्वभावानुसार नाव ठरवायचं झालं, तर ते राजाच असायला हवं. याची अगदी अनेक कारणं आहेत. पण त्यातलं अगदी महत्त्वाचं कारण म्हणजे तो कधीही कुणाचंही वाईट चिंतीत नाही. अगदी शत्रूचंही. मला त्याच्या या गुणाचं फार आश्चर्य वाटतं. राजा माझा परममित्र असण्याचं हे एक सर्वांत महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. कारण राजला भेटेस्तोवर मला शत्रूबाबत विषारी भावना माझ्या मनात येत नाही ही माझी दुर्बलता वाटत असे. पण राजला भेटल्यावर माझ्या मनातली भावना न्यूनगंडासारखी होती, ती माझ्या शक्तिस्थानासारखी वाटू लागली.
राजमध्ये प्रचंड करिष्मा आहे, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. पण हा राजचा करिष्मा किंवा राजची ती जादू योगायोगाने किंवा अपघाताने आलेली गोष्ट नाही. राज वयाच्या तेवीसाव्या वर्षापासूनच राजकारणात आहे. तेव्हापासून त्याने कण-कण करून माणसं जोडलेली आहेत. त्यांची काळजी केलेली आहे. आजही राज जेव्हा बाहेर कुठेही किंवा दौर्यावर जातो, तेव्हा बरोबरच्या माणसांची आधी काळजी घेतो. त्यांची सोय नीट होते आहे की नाही यावर त्याचं अगदी बारीक लक्ष असतं. राज आक्रमक राजकारण करतो किंवा त्याची वक्तृत्वकला तडफदार आहे म्हणून केवळ जादू पसरत नाही, तर सोबतच्या माणसांची तो पराकोटीची काळजी घेतो. जनतेला असा नेता आवडला तर नवल काय? व्यवसायामुळे म्हणा किंवा कामाच्या प्रकारामुळे देशातले अनेक सामाजिक आणि राजकीय नेते मी पाहिले. बहुतेकांना आपल्या बायका-मुलांपलीकडे कुणी माणसं आपल्यासोबत असतात आणि त्यांची काळजी आपणच वाहायला हवी याची जाणीवच नसते. राज या सार्यांपेक्षा अगदी वेगळा आहे. |